Category Archives: Latest NEWS

Day 1

धर्माबाद येथे आयोजित ‘कुसुमांजली’ युवक महोत्सवासाठी विविध महाविद्यालयांचे संघ मिळेल त्या वाहनाने दाखल झाले.

स्वारातीम विद्यापीठाच्या ‘कुसुमांजली’ युवक महोत्सवाच्या शोभायात्रेत स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याचा संदेश देताना विद्यार्थी.

(कै. पद्मश्री श्यामरावजी कदम मंच )
ंस्त्रियांवर होणारे अन्याय, स्त्रीभ्रूण हत्या, समाजात मिळणारी हीन दर्जाची वागणूक यावर युवक महोत्सवात हिंदी व मराठी एकांकिकांमधून स्पर्धकांनी प्रकाश टाकला. याला आळा बसावा यासाठी संदेश देत समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.
मंच क्र. २ वरील शिवाजी विधी महाविद्यालय परभणीच्या ‘उमंग’ या हिंदी एकांकिकेने सुरुवात झाली. स्त्री सत्तेवर असूनसुद्धा कारभार पुरुषच पाहत असतो. ती आजही पतीच्या हातचे बाहुले बनल्याचे दाखविले. स्त्रीभ्रूण हत्या थांबली पाहिजे, यासह स्त्रीवर होणार्‍या अन्यायाचे विदारक चित्र समोर आणले. अनुराधा मंडीक, मयुरी, कांकरीया, भाग्यश्री कांकरीया, नाझमीन सय्यदा, निकिता व्यास, धनंजय धोंडगे, चैतन्य पाटील, विष्णू चंदेल आदींनी यात सहभाग घेतला. तर नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेडच्या संघाने ‘नेहरुबाई’ या एकांकिकेमधून १९५९मध्ये मध्य प्रदेशात घडलेल्या एका घटनेवर प्रकाश टाकला. आदिवासी स्त्रीने समाजबाह्य कृत्य केल्यास तिला समाजाबाहेर काढले जाते. जातपंचायत, आजही स्त्री-पुरुषांना कशी बहिष्कृत करते, याचे ज्वलंत उदाहरण त्यांनी या एकांकिकेतून दाखविले. अविनाश बोबडे, सुभाष राऊत, अब्दुल साजीद, संतोष खडकीकर, अंकुश साडेगावकर, वैष्णवी गोडेगावकर, राजर्षी जाधव, सरिता क्षीरसागर, गजिर्ना आवर्दे यांनी चांगल्या भूमिका वठविल्या.
यशवंत महाविद्यालय नांदेडच्या ‘कुटज’ पत्थर पे लिखे है फूल या एकांकिकेने दलित व सवर्ण यांच्यातील कलह व त्याचे समाजावर होणारे परिणाम साकारले. यामध्ये मयुरी घोडजकर, नितीन टेकाळे, राहुल गायकवाड, धनश्री पवार, संतोषी पेशवे, अनुराग त्रिपाठी, रुबिना बेगम आदींनी सहभाग नोंदविला.
एकूणच या एकांकिकेमधून स्पर्धकांनी समाजातील वास्तव स्थितीवर प्रकाश टाकून उजाळा देण्याचे काम केले आहे. दुपारी२ वाजता सुरू होणारी एकांकिका तब्बल सहा तास उशिराने सुरू झाली. रात्री १२ पर्यंत या एकांकिकेला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली.

उद्याचे कलावंत नाटककार, नर्तक, वादक, युवक महोत्सवासारख्या व्यासपीठावरून तयार होतात. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना या माध्यमातून वाव मिळतो. युवकांनी अभ्यासासोबतच आपल्या अंगी असलेले कलागुण सादर करून, उद्याचा कलावंत निर्माण होण्याचे सामर्थ्य निर्माण करावे, असे आवाहन पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी रविवारी (ता. 16) केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व धर्माबादच्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या “कुसुमांजली-2011 युवक महोत्सवाचे शंकरनगरी धर्माबाद येथे उद्‌घाटन झाले. कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे अध्यक्षस्थानी होते. सिने अभिनेत्री मनीषा केळकर, आमदार वसंतराव चव्हाण, उच्च शिक्षण विभागाच्या शिक्षण सहसंचालिका डॉ. ऊर्मिला धूत, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक डॉ. वसंत भोसले, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. गणेश शिंदे, धर्माबाद शिक्षण संस्थेचे सचिव मूलचंद पांडे, कोषाध्यक्ष गंगाधर गुजराथी, संचालक कमलकिशोर काकानी, लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषद सचिव अपर्णा रुद्रावार, प्राचार्य डॉ. एन. व्ही. कल्याणकर, दिगंबर कदम यांची या वेळी उपस्थिती होती.

श्री. सावंत म्हणाले, की युवक ही मोठी ताकद आहे. त्यांनी ग्रामीण भागातील प्रश्‍नाकडे लक्ष द्यावे. स्वत:ची अंगी निर्णय घेण्याची क्षमता असावी. चांगले, वाईट ठरवणे आताच शिकले पाहिजे. सामाजिक, शैक्षणिक उपक्रमात सहभाग नोंदवून, वृक्ष लागवड, स्वच्छता व हागणदारी मुक्तीकडे लक्ष द्यावे, असा उपदेश त्यांनी केला.

कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी, विद्यापीठात मराठवाड्यातील कलावंतांसाठी “स्कूल अँड फाईन अँड परफार्मिंग’ हा अभ्यासक्रम सुरू केला. एक चांगली संधी विद्यार्थ्यांना आहे, त्यांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

विद्यार्थी कल्याण मंडळाच्या सल्लागार समितीचे सदस्य डॉ. अंबादास कदम, अंबादास कांबळे, प्रा. डॉ. अजय टेंगसे, प्रा. सुनील व्यवहारे आदींचा सत्कार करण्यात आला. मागील वर्षी युवक महोत्सवाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांचा विद्यापीठाच्या वतीने सत्कार करण्यात आला. उपप्राचार्य पी. जी. धोटे, करुणा पतंगे, सांस्कृतिक विभागप्रमुख एस. व्ही. रणवीर, के. व्ही. कल्याणकर, जी. डी. जाधव या वेळी उपस्थित होते. विद्याधर देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

युवक महोत्सवाच्या थाटात शुभारंभाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या फाईन अँड परफार्मिंग आर्टची विद्यार्थिनी मंजिरी शेट्टी हिने सादर केलेल्या कथक नृत्याच्या आविष्काराने महोत्सवाची सुरवात रंगतदार ठरली.

तरुणांनी आवडीचे क्षेत्र निवडून करिअर करावे – अभिनेत्री मनीषा केळकर
युवक महोत्सवाचा उद्‌घाटन सोहळा सुरू असतानाच उपस्थितांचे लक्ष वेधले, ते अचानक आलेल्या सिने अभिनेत्री मनीषा केळकर हिने. हसतमुख भाव घेऊन, हात उंचावत विद्यार्थ्यांची मने तिने जिंकली. मनीषाने विद्यार्थ्यांनी आपले आवडीचे क्षेत्र निवडून, त्यात करिअर करावे, असा सल्ला दिला.